नवी दिल्ली-महेंद्रसिंह धोनीने मैदानात आपल्या धडाकेबाज कामगिरीचा सपाटा चालूच ठेवला आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवत मालिका २-१ ने खिशात घातली. रोहित शर्माच्या शतकाने इंग्लंडने दिलेले १९९ धावांचे आव्हान भारताने सहज पार केले. मात्र याही सामन्यात धोनीने आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद करत आपली दखल सर्वांना घेणे भाग पाडले आहे. टी-२० च्या एका सामन्यात यष्टींमागे ५ झेल घेणारा धोनी पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.
सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर धोनीने लियाम प्लंकेटचा झेल पकडत हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. याचसोबत धोनी हा टी-२० क्रिकेटमध्ये ५० झेल घेणारा पहिला यष्टीरक्षक ठरलाय. काही दिवसांपूर्वीच धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा ५०० वा सामना खेळला होता. धोनीने आजच्या सामन्यात जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, इयॉन मॉर्गन, जॉनी बेअरस्ट्रो आणि लियाम प्लंकेटचा झेल घेतला. याचसोबत धोनीने ख्रिस जॉर्डनला धावबादही केले.