पुणे : महेंद्रसिंग धोनी कर्णधारपद सोडल्यापासून जरा जास्तच चर्चेत आला आहे. अर्थात त्याची चांगली कामगिरी आणि कुल स्वभावाचे असंख्य चाहते आहेत. काल पुण्यात झालेल्या सामन्यातील एका घटनेने पुन्हा धोनीच्या चाहत्यांची छाती गर्वाने फुलून आली आहे. गहुंजे मैदानावर झालेल्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने रिव्ह्यूचा (डिसीजन रिव्ह्यू सिस्टम) निर्णय कर्णधार विराट कोहलीच्या अगोदर घेतला आणि तो निर्णय योग्य ठरल्याने ती रीव्हीव्हची क्लिप सध्या सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय झाली घटना?
इऑन मॉर्गन हा खेळत होता. एक बॉल येऊन त्याच्या बॅटला चाटून गेला. हा झेल आहे आणि मॉर्गन बाद झाला आहे या बद्दल धोनीला आत्मविश्वास होता. त्याने पंचाकडे पाहिले. परंतु पंचाने मॉर्गन बाद झाल्याचा निर्णय दिला नाही.तेव्हा तात्काळ महेंद्र सिंह धोनीने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर कर्णधार विराट कोहलीने पुढच्याच क्षणाला दुजोरा दिला. जेव्हा धोनी आणि विराट एकमेकांजवळ आले तेव्हा विराटने धोनीकडे पाहिले तो धोनीला या विकेटबद्दल आत्मविश्वास असल्याचे त्याच्या लक्षात आले.
आणि मॉर्गन परतला तंबूत
रिव्ह्यूमध्ये पंच नंदन यांचा निर्णय बदलण्यात आला. २६ बॉलमध्ये २८ धावा करणाऱ्या मॉर्गनला तंबूमध्ये परतावे लागले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये देखील या रिव्ह्यूची चर्चा झाली. याबदद्ल विराट कोहलीला विचारले असता त्याने धोनीवर विश्वास दर्शवला. आपण याबाबतची आकडेवारी पाहिले असल्याचे विराटने पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. धोनीने जेव्हा – जेव्हा रिव्ह्यूचा निर्णय घेतला आहे ते जास्तीत जास्त वेळा अचूक ठरले आहेत असे विराटने म्हटले. धोनीने त्याच्या कारकीर्दीत घेतलेले ९५ टक्के रिव्ह्यूचे निर्णय बरोबर ठरले आहेत असे विराटने म्हटले.
वाद घालण्याचा प्रश्नच नाही
महेंद्र सिंह धोनीचा याबाबतचा अनुभव मोठा आहे. तो यष्टीमागे असतो, तेव्हा तो येणाऱ्या प्रत्येक बॉलबद्दल सजग असतो त्यामुळेच धोनीने घेतला निर्णय हा माझ्यासाठी अंतिमच होता असे विराटने स्पष्ट केले. जेव्हा मला धोनी सांगतो बॉल हा लाइनच्या बाहेर आहे किंवा आत आहे तेव्हा त्यावर वाद घालण्याचा माझ्यासाठी प्रश्नच उद्भवत नाही असे विराटने म्हटले. धोनी हा अतिशय चाणाक्ष खेळाडू आहे. डीआरआसच्या बाबतीत मी त्याच्या निर्णयावर पूर्णपणे विसंबून राहू शकतो असे देखील विराटने म्हटले. धोनीच्या निर्णयामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या रिव्ह्यूची क्लिप खूप वेळ शेअर करण्यात आली आहे.