धोनीच्या यशाचा वारसा पुढे चालविणार

0

पुणे: संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देशास जागतिक स्तरावर जे स्थान मिळवून दिले आहे, तसा वारसा पुढे नेण्याचे आव्हान माझ्यापुढे आहे. आजपर्यंत दाखविलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर व सहकाऱ्यांच्या बहुमोल सहकार्याच्या जोरावर हा वारसा मी यशस्वीपणे पुढे नेईन, अशी मला खात्री आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये विश्वचषक जिंकण्याचा क्षण एक खेळाडू म्हणून मी अनुभवला आहे. आता कर्णधार म्हणून २०१९ मध्ये हाच क्षण पुन्हा अनुभवायचे माझे स्वप्न आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गहुंजे येथे येत्या रविवारी होणार आहे. कोहलीने सांगितले, ‘भारताचे कर्णधारपद भूषवणे ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. वरिष्ठ संघात स्थान मिळविण्यापूर्वी मी कनिष्ठ संघाचे नेतृत्व करताना भारताला नेत्रदीपक यश मिळवून दिले होते. त्यामुळे वरिष्ठ संघाचे कर्णधारपद कारकीर्दीत कधी तरी करावे लागणार याची मला कल्पना होती. साहजिकच कर्णधारपदाचे कोणतेही दडपण माझ्यावर नाही. सहकारी खेळाडूंवर विश्वास ठेवला व त्यांच्यामधील गुणदोष याचा सखोल अभ्यास केला तर नेतृत्वाची जबाबदारी सहज पार करता येते.

सचिन तेंडुलकर हा माझ्यासाठी आदर्श खेळाडू आहे. वरिष्ठ संघात आल्यानंतर सुरुवातीला अडचणीच्या काळात त्याच्याकडून मिळालेले मार्गदर्शन माझ्यासाठी खूपच मौल्यवान ठरले. कोणाचेही अनुकरण करण्याऐवजी स्वत:च्या खेळातील उणिवांचा बारकाईने अभ्यास करून त्या दूर करण्यावर भर दिला तर आपली फलंदाजी अधिक चांगली होते, हा त्याने दिलेला कानमंत्र माझ्यासाठी प्रेरणादायकच ठरला आहे, असे कोहलीने सांगितले.