धोनीने सोडले पुणे सुपरजाइंट्सचे कर्णधारपद

0

मुंबई । टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलची टीम पुणे सुपरजाइंट्सचं कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे धोनीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएलच्या 9 व्या सत्रात धोनीने पुण्याचे कर्णधारपद सांभाळलं होतं. धोनीच्या कर्णधारापदाखाली संघाच्या कामगिरीवर पुणे संघाच्या व्यवस्थापकीय समितीने नाराजी व्यक्त केल्याने त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचं वृत्त आलं होतं. मात्र ते वृत्त चुकीचं असून धोनीने स्वतःहून कर्णधारपदावरून बाजुला होण्याचा निर्णय घेतल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

पुण्याला धक्का
एक खेळाडू म्हणून धोनी संघासोबत कायम असणार आहे. गेल्या वर्षी 17 सामन्यांपैकी पुणे सुपरजायंट्सने केवळ पाच सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळेच धोनीची कर्णधारपदावरून गच्छंती केल्याचं बोलले जात होते. यापूर्वी स्टिव्ह स्मिथने राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं, तर धोनीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा होती. मात्र, या दोन्ही संघांवर मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली आहे. आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणार्‍या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.