धोनीविरुद्ध बोलणार्‍यांवर चाहत्यांचा हल्लाबोल

0

नवी दिल्ली । भारतीय संघाने न्यूझीलंडवर विजय मिळवत टी-20 मालिकेवर आपले नाव कोरले. मात्र, एक वाद असा आहे जो संपण्याचं नावचं घेताना दिसत नाहीये. हा वाद आहे महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या निवृत्तीसंदर्भात. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसर्‍या टी-20 सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवानंतर महेंद्रसिंद धोनीला आता टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यायला हवी अशी मागणी होऊ लागली. धोनीने निवृत्ती घ्यायला हवी असे काही माजी क्रिकेटपटूंनी म्हंटले तर काहीजण धोनीच्या पाठीशी उभे राहिले. धोनीने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली पाहिजे असे म्हणणार्‍यांमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांचा समावेश होता.

भारतीय संघातील माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने एका मुलाखतीत म्हटले की, धोनीच्या जागी आता दुसर्‍या खेळाडूला संधी देण्याची वेळ आली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीची भूमिका योग्य आहे मात्र, टी-20 क्रिकेटमध्ये वेगळी आहे. तुम्ही जोपर्यंत संघाचे कर्णधार असता तोपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र, सध्या एक फलंदाज म्हणून आम्ही त्याला मिस करत आहोत.

अजित आगरकरने दिलेल्या या मुलाखतीनंतर ट्विटर युजर्सने त्याच्यावर हल्ला चढवला. धोनीच्या चाहत्यांनी आगरकरचा चांगलाच क्लास घेतला. धोनीच्या समोर आगरकर काहीच नाहीये असे कुणी म्हटले. तर कुणी म्हटले की, आधी आगरकरने आपले करिअर पहावे आणि नंतर धोनी संदर्भात बोलावे. अजित आगरकर व्यतिरिक्त आकाश चोपडा, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही धोनीने दुसरा पर्याय शोधला पाहिजे असं म्हटलं होते.