दिल्ली । न्यू झीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यानंतर निवृत्त झालेल्या आशिष नेहराने महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत मत व्यक्त केले आहे. राजकोटमध्ये झालेल्या दुसर्या टी-20नंतर धोनीवर टीकेची झोड उठली होती. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कोहली मोठे शॉट्स मारत होता पण धोनीला मात्र जलद धावा बनवता आल्या नाहीत. यानंतर व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि अजित आगरकरने धोनीच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले. तर सेहवाग आणि गावस्कर यांनी मात्र धोनीची पाठराखण केली. या वादावर आता आशिष नेहराने भाष्य केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंतला संधी देण्याची सूचना आशिष नेहराने केली आहे. पण निवड समितीने धोनीला विश्रांतीची गरज आहे का याचा निर्णय त्याला स्वत:लाच घेऊन द्यावा, असेही नेहरा म्हणालाय.
धोनीला पर्याय शोधा- गांगुली
टी-20 क्रिकेटमध्ये धोनी चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला पर्याय शोधण्याबाबत विचार करायला हवा, असं गांगुली म्हणाला आहे. धोनीच्या संघामधील भूमिकेबाबत संघव्यवस्थापनाने बोलण्याची आता वेळ आली आहे. धोनी टी-20मध्ये आला तेव्हा मोठे नाव होतं. त्यामुळे धोनीला स्वत:ला सिद्ध करण्याची पूर्ण संधी मिळाली पाहिजे, असे गांगुली एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणलाय. संघ व्यवस्थापनाने 2019च्या विश्वचषक स्पर्धेकडेही लक्ष दिले पाहिजे. जर धोनीच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली नाही तर पर्यायाबाबत विचार करावा लागेल, असे वक्तव्य गांगुलीने केलंय. धोनीला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यापेक्षा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्यात यावे, अशी मागणी गांगुलीने केली आहे.
चौथ्या क्रमांकावर यावे
धोनीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले तर त्याला खेळपट्टी स्थिरावण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि मग त्याला आक्रमक खेळ करता येईल, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली आहे. कोहलीने केलेल्या धोनीच्या समर्थनाबद्दलही गांगुलीने भाष्य केले आहे. कर्णधाराने दाखवलेल्या भरवशाचा फायदा खेळाडूला कामगिरी उंचावण्यासाठी होतो, असे गांगुली म्हणाला.