धोनी, रहाणेच्या अनुभवाचा फायदाच

0

पुणे : इंडियन प्रिमिरम लीगच्या (आयपीएल) दहाव्या मोसमात पुणे रायझिंग संघाकडून भारताचा माजी कर्णधार महेंंद्रसिंग धोनी व अजिक्य रहाणे खेळणार असल्याने त्यांच्या अनुभवाचा संघाला फायदाच होईल, असे मत पुणे रायझिंग संघाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने केले.

पुणे रायझिंग संघाच्या सुपरजायंट ऑन व्हिलचे आणि संघाच्या जर्सीचे अनावरण स्मिथ, संघाचे मुख्य मार्गदर्शक स्टिफन फ्लेमिंग, सहाय्यक मार्गदर्शक हृषिकेश कानिटकर, संघाचे सीईओ रघू आयर, अभिनेता कुणाल कपूर आदींच्या हस्ते शनिवारी येथे करण्यात आले. त्यावेळी स्मिथ बोलत होता.

पुणे रायझिंग संघ या मोसमात चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही स्मिथने व्यक्त केला. स्मिथ म्हणाला, कसोटी आणि टी-ट्वेंटीत खेळाचे स्वरूप भिन्न असते. टी-ट्वेंटीमध्ये परिस्थिती वेगळी असल्याने खेळपट्टीचा जास्त विचार करत नाही. धोनी हा सर्वोत्तम खेळाडू आहे. तो आत्ता चांगल्या लयीत आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल. या मोसमात फिरकीपटू अश्‍विन संघात असणार नाही. त्याची अनुपस्तिती आम्हाला नक्की जाणवेल. परंतु, अश्‍विनच्या अनुपस्थितीत इम्रान ताहीरवर फिरकीची मदार असेल. टी-ट्वेंटीमध्ये लेगस्पिन प्रभावी ठरत असून, ताहीरच्या समावेशामुळे अडचण जाणवणार नाही.

आयपीएल सामन्यांसाठी आम्ही यावेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. इम्रान ताहीरच्या समावेशामुळे संघ समतोल झाला आहे. ताहीरचा लेगस्पिन प्रभावी ठरू शकतो. धोनी आणि रहाणे हे भारताचे दोन्ही आजी-माजी कर्णधार संघात असल्याने संघाची ताकद वाढली आहे. त्यांचे सहकार्यही मोलाचे ठरू शकते. सोबतच बेन स्टोेकच्या समावेशाने फलंदाजी भक्कम झाली आहे. नवोदित खेळाडूंनाही चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. स्मिथकडे कर्णधारपद सोपवल्याने मी या मोसमाबाबत खूप उत्सुक आहे, असे फ्लेमिंग म्हणाले.

कानिटकर म्हणाले, की पुणेकर असल्याने मला गहुंजेच्या खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे. स्थानिक परिस्थिती कशी आहे, खेळपट्टीचे स्वरूप काय असेल याबद्दल भारतीय खेळाडूंना मी मार्गदर्शन करणार आहे.