धोनी हा संघातील सर्वात हुशार खेळाडू

0

– कर्णधार कोहलीने उधळली स्तुतिसुमने

पुणे : धोनी हा सर्वात हुशार खेळाडू असून त्याचा नेहमीच आदर आहे. जेव्हा कधी मी संकटात असेन किंवा पेचात अडकलो असेन तेव्हा धोनीचा सल्ला घेण्यासाठी लाजणार नाही असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. इंग्लंडसोबतच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले असून धोनी हा आमच्यासाठी सिक्स सेन्स असल्याचे त्याने म्हटले आहे.

‘सिक्स्थ सेन्स’ आमच्यासाठी अमूल्य
यष्टींमागे उभ्या असणाऱ्या धोनीकडून डीआरएस अपीलच्यावेळी दाखविण्यात येणारा ‘सिक्स्थ सेन्स’ आमच्यासाठी अमूल्य असल्याचे कोहली म्हणाला. गेल्या काही वर्षांमध्ये कर्णधारपदी असताना धोनीने निर्णय घेताना दाखविलेली समयसूचकता पाहता धोनीचा शब्द हा माझ्यासाठी अंतिम आहे. मी काल धोनीने केलेल्या अपील्सच्या आकडेवारीवर नजर टाकली. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, धोनीने त्याच्या कारकीर्दीत केलेली ९५ टक्के अपील्स यशस्वी ठरली आहेत. एखादा चेंडू रेषेबाहेर पडला आहे किंवा यष्टीच्या बाहेर जात आहे, हे एकदा धोनीने सांगितले की, त्याबाबत कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही. जेव्हा कोणतेही अपील करायचा प्रश्न येतो तेव्हा धोनीने नेहमीच चाणाक्षपणा दाखवला आहे. त्याच्या शब्दावर मी एका पायावर विश्वास ठेवायला तयार आहे. विकेट कीपर आणि फलंदाज म्हणून खेळताना त्याच्यावरचा दबाव नक्की कमी झालेला असेल असा विश्वास विराटने यावेळी व्यक्त केला. ‘तो मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करेल असे मला वाटते. मोठा शॉट खेळताना तो दोनदा विचार करणार नाही’, असेही विराट म्हणाला. भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत तिस-या क्रमांकावर आहे. इंग्लंडसोबतच्या या मालिकेनंतर भारत कोणतीही एकदिवसीय मालिका खेळणार नसून जूनमध्ये होणा-या चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी तयारी करणार आहे.