धो धो बरसला!

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : गेल्या तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या मोसमी पावसाने शनिवारी रात्रीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्हाभरात व राज्यात धुव्वाधार हजेरी लावली आहे. रात्रीपासून धो धो बरसणार्‍या पावसाने दोन्हीही शहरांना पाणीपुरवठा करणार्‍या धरणांत चांगला जलसाठा झाला असून, या शहरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. शिवाय, जिल्हाभरात सर्वदूर हजेरी लावल्याने खरिपांच्या पिकांनाही जीवदान मिळाले. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने धुव्वाधार हजेरी लावल्याने या भागातील दुष्काळ वाहून गेला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभऱ टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. मुळा-मुठा नद्यांनाही पूर आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. बारामती, इंदापूर या तालुक्यात दिवसभर संततधार होती. मुंबईची तर तुंबई झाली होती. मराठवाड्यातील पूरस्थितीत तिघे वाहून गेल्याने चिंता व्यक्त केली जात होती. नाशिक, नगर जिल्ह्यातही संततधार असल्याने ओव्हरफ्लो झालेल्या धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता.

वेधशाळेचा अंदाज खरा, आता बारामतीची साखर हवी!
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात चिंतेचे सावट होते. मावळ व ग्रामीण भागातील पिकांनीही माना टाकल्या होत्या. पुणे वेधशाळेने 25 ऑगस्टपर्यंत परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही हा अंदाज खरा ठरला तर, बारामतीची साखर वेधशाळेच्या अधिकार्‍यांच्या तोंडात टाकू, अशी खिल्ली उडविली होती. परंतु, शनिवारी मध्यरात्रीपासून मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत, गेल्या 24 तासांत जून व ऑगस्टमधील पावसाची उणिव भरून काढली. या पावसाने बळिराजा सुखावला असून, शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचीही समस्या मिटली आहे. पुणे धरणाला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीसह पवना धऱणातही जोरदार पाणीसाठा झाला आहे. पवना शंभर टक्के भरल्याने त्यातून विसर्ग सुरु करण्यात आला होता. अवघ्या चार दिवसांवर गणरायाचे आमगन आल्याने गणरायच पाऊस घेऊन आला, अशी भावना पुणेकर व्यक्त करत होते.

चिंता नाही; धरणसाठ्यांत वाढ!
राज्यात मान्सून सक्रीय झाल्याने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात संततधार सुरु होती. यंदाच्या पावसाळ्यात 77 दिवसांपैकी केवळ 29 दिवसच पाऊस झाला होता. त्यामुळे मराठवाडा, विदर्भावर दुष्काळाचे ढग दाटून आले होते. खरिपाची पिके जळून गेली होती. आठवडाभरात 34 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. आता संततधार पावसामुळे दुष्काळ वाहून गेला असून, सर्वत्र दमदार पाऊस कोसळत होता. गेल्या 24 तासांत 47 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, नांदेड व उस्मानाबादेत ओल्या दुष्काळाचे संकट दाटले आहे. तर महापुराच्या घटनांत तीन जण वाहून गेले होते. पुणे जिल्ह्यातही संततधार पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच, धरणसाठ्यांतही चांगलीच वाढ झाली आहे. भुशी, पवना धरण, खडकवासला धरण साखळी यासारख्या धरणांत चांगला जलसाठा झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली असून, गोदावरी नदी दुथडी भरून वाहात होती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.