तळोदा। शासकीय योजनांचा उपयोग शिक्षणासाठी करून ध्येयपूर्तीचे शिखर गाठा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी यांनी केले. अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रिटिश अंकुशविहीर येथे मानव विकास मिशन योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल योजनेतून सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्याविकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी हे होते.
सायकल वाटपप्रसंगी मार्गदर्शन करतांना नागेश पाडवी म्हणाले की, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शासन योजनांचा लाभ घेऊन शिक्षणातील आपली क्षमता सिद्ध करावी. शैक्षणिक योजनांचा माध्यमातून ध्येय रुपी शिखर गाठत आपल्या ज्ञानाचा उपयोग गरीब, गरजू विद्यार्थ्यांना करावा. जेणेकरून शिक्षणापासून वंचित समाजाला शिक्षण गंगोत्रीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे शासन योजनांचा फायदा घेऊन इतर विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्ज्वल करता येईल. याप्रसंगी मुख्याध्यापक दत्तात्रय सूर्यवंशी, पर्यवेक्षक जे एस झाल्टे, जी. के. चव्हाण, डी. बी. मराठे, पी. बी. साळवे, के. बी. राजपूत, एम बी. माळी, एस. ई. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन जे. यू. जावरे यांनी केले.