नवी दिल्ली । कारकीर्द घडवताना सर्वोच्च ध्येय ठेवा आणि ते गाठण्यासाठी संधीची वाट पाहा. मेहनत घेण्यास कमी पडू नका. मेहनतीत सातत्य ठेवून संधीची वाट पाहिल्यास यश नक्कीच तुमच्या समोर उभे राहील असे आवाहन स्पेनची माजी टेनिसपटू अरांता सँचेझ हिने केले. जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकनावर असलेल्या स्टेफी ग्राफवर 1989 मध्ये मिळविलेला विजय हाच कारकिर्दीमधील सर्वोत्तम क्षण असल्याचे तिने यावेळी सांगितले. ग्रँड स्लॅम विजेतेपदाबरोबर अरांताने चार ऑलिंपिक पदके मिळविली आहेत.
फ्रेंच ओपन वाईल्ड कार्ड स्पर्धेची घोषणा
फ्रेंच ओपन वाईल्ड कार्ड स्पर्धेच्या घोषणेसाठी अरांता दिल्लीला आली होती. कारकिर्दीत चार ग्रँड स्लॅम विजेतीपदे मिळविणार्या अरांताने या वेळी कुमार टेनिसपटूंशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, वयाच्या चौथ्या वर्षी टेनिस खेळायला सुरवात केली आणि 14व्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू बनले. 1989 मध्ये पहिले फ्रेंच ओपन विजेतेपद मिळविले आणि 1994 मध्ये जागतिक क्रमवारीत एकेरी आणि दुहेरीत अव्वल मानांकनापर्यंत पोचले. या सगळ्यात 1989 मध्ये मिळविलेल्या फ्रेंच ओपनच्या विजेतेपदापेक्षा अंतिम लढतीत अव्वल मानांकित स्टेफीला हरवल्याचा मला अधिक आनंद होता. त्या वेळी स्टेफी जवळपास अडीच वर्षे अपराजित होती. अरांता म्हणाली, “अंतिम लढतीच्या वेळी मी काहीशी निराश होते. पण, स्टेफीशी खेळायचे म्हणून नाही, तर फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठणारी मी पहिली स्पॅनिश खेळाडू होते.
देशासाठी खेळावे
अरांताच्या मनात स्टेफिशी झालेली लढत इतक्या वर्षानंतरही घर करून होती. त्या लढतीत मिळविलेल्या प्रत्येक गुणानुसार तिने लढतीचे वर्णन केले. ती पुढे म्हणाली, “ग्रँड स्लॅम स्पर्धा दरवर्षी होते. ऑलिंपिक दर चार वर्षांनी होते. ती पुढे म्हणाली की, तुमची ऑलिंपिक पदकाची संधी हुकले, तर तुम्हाला त्या क्षणासाठी पुन्हा चार वर्षे प्रतिक्षा करावी लागते. व्यावसायिक टेनिसपेक्षा त्या स्पर्धेचे वातावरण आणि देशासाठी खेळण्याची भावना काही वेगळीच असते.”यासाठी खेळभावना ही महत्वाची असल्याचे तिने सांगितले.