धाडस, कष्ट, चिकाटीच्या जोरावर पुण्यातील एकपात्री कलाकार-स्टार आर्टिस्ट चैताली माजगावकर-भंडारी (वय 34) स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मनोरंजनपर एकपात्री प्रयोग आणि गेम शोच्या निमित्ताने चैतालीने सारा महाराष्ट्र पिंजून काढलाय. तिचे वडील नकलाकार व काका जादूचे प्रयोग करायचे. स्नेहसंमेलनात, गणेशोत्सवात ती विनोद सादर करायची. एकदा तिने तिच्या काकांची नक्कल केली होती. तेव्हा आपल्याला अभिनय चांगला जमतोय हे चैतालीच्या लक्षात आले. त्यामुळे चैतालीने पुणे विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली.
लग्नानंतर चैतालीने दूरचित्रवाणीवरील हास्यसम्राट या कार्यक्रमासाठी ऑडीशन दिली. त्यात तिची निवड झाली अन् चैताली माजगावकर हे नाव घराघरात पोचले. तुमचं आमचं सेम असतं (एकपात्री), लेडिज एक्स्प्रेस (ऑर्केस्ट्रा) या कार्यक्रमांची निर्मिती केली. या दोन्हीचे मिळून 80 हून अधिक प्रयोग झाले. बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असल्याने तिने पपेट शो सुरु कला. त्यासाठी स्वकमाईतून मोठी गुंतवणूक केली. पपेट शोचे आजवर 150 प्रयोग झाले. गंमत-जंमत हा मनोरंजनकर कार्यक्रम ती आणि तीचे वडील सादर करतात. ती घेत असलेल्या गेम-शोचेदेखील 1 हजार प्रयोग झाले आहेत. चैतालीने स्वतःची संस्थाही सुरू केली आहे. तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
-संध्या टोमके, पुणे
कला-अभिनय क्षेत्रात करिअर करताना मी माझ्याशीच स्पर्धा केली. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवताना धाडस हवे, तोटा सहन करण्याची तयारी हवी. मी कष्टाने पैसा उभा केला. महिला कलाकार म्हणून मान मिळाला तसेच काहीसे वाईट अनुभवही आले. मी केलेल्या कामाचा मला अभिमान आहे. यापुढे मी मालिका व चित्रपटक्षेत्राकडेही वळत आहे.
– चैताली माजगावकर