ध्येय गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी बाळगण्याची आवश्यकता

0

भुसावळ । सध्याचे युग हे स्पर्धात्मक युग असून विद्यार्थ्यांनी करिअरची सुरुवात करताना आधुनिकतेची कास धरावी, तसेच आपले इच्छित ध्येय गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वासाने कार्य केल्यास यशस्वी होणे शक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले. शहरातील डॉ. बी.व्ही. खाचणे सभागृहामध्ये गुर्जर क्लबतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून योगशिक्षक योगेश चौधरी, आर.के. पाटील, डॉ. विजेश चौधरी, बी.यु. पाटील, विश्‍वनाथ महाजन आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन करण्यात आले.

इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवा
याप्रसंगी प्रमुख वक्ते योगशिक्षक योगेश चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशाकडे अंध विश्‍वासाने पाहू नका. इतिहास वाचण्यापेक्षा स्वत:चा इतिहास घडविण्याची आवश्यकता आहे. तसेच इतिहास घडवितांना स्वतःच्या क्षमता ओळखाव्या. जिद्द असेल तर काम नक्कीच उत्कृष्ट होते. आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मन सुदृढ असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी जिद्दीने पेटावे. आपण नाव कमावल्यास समाजाचे नाव मोठे होते. त्याकरीता जबाबदारीची जाणीव ठेवून आपले कौशल्य विकसीत करा. मनस्थिती बदलवा त्यामुळे गरजा पूर्ण होतात. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास होणे महत्वाचे आहे. आधुनिकतेची कास धरुन समाजसेवा करावी. समाजसेवेमुळे आत्मशांती मिळते. असेही चौधरी म्हणाले.

15 विद्यार्थ्यांचा गौरव
मृदला चौधरी, वेदांत चौधरी, आदिती अविनाश महाजन, प्रणव कैलाश पाटील, सिध्देश रवींद्र पाटील, संकेत गुजर, आदित्य पाटील, शुभम संजय पाटील, अनुजा सुनील चौधरी, रेखा वसंत पाटील, अश्‍विनी महाजन आदी 15 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यशस्वितेसाठी डी.एस. महाजन, सुरेश पाटील, एन.डी. पाटील, प्रमोद चौधरी, अविनाश महाजन, गंभीर पाटील, राजेंद्र गुर्जर, रवींद्र चौधरी, राहुल चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन उज्वला महाजन यांनी तर आभार एन.डी.पाटील यांनी मानले.