भुसावळ । जीवनात यशस्वी होण्यासांठी ध्येय असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवड व क्षमता तपासून त्यादृष्टीने करिअर निवडावे आणि त्यावर पुर्णपणे लक्ष केंद्रीत करुन पुढील वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळणार असे प्रतिपादन नाशिक येथील करिअर मार्गदर्शक योगेश बाहेती यांनी केले. शहरातील कृष्णचंद्र सभागृहात रविवार 25 रोजी पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोहानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे आयोजित ‘माझे कौशल्य माझा विकास’ कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेण्याची गरज
यावेळी आमदार संजय सावकारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ. सुनिल नेवे, अनिकेत पाटील, प्रशांत नरवाडे, सिद्धार्थ सोनवणे, राजु खरारे, अतुल जैन उपस्थित होते. यावेळी आमदार सावकारे यांनी सांगितले की, पूर्वी ठराविक शिक्षण घेतले जात होते. मात्र जसजशी प्रगती होत गेली त्यानुसार बदलत्या काळानुसार नवनविन शिक्षण घेतले जात आहे. विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने भाजपा अनुसुचित जाती मोर्चाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष सरजू तायडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन संघदिप नरवाडे यांनी तर आभार अतुल जैन यांनी व्यक्त केले.
संवाद कौशल्य वाढवा
पुढे बोलतांना बाहेती म्हणाले की, मनातील जिद्द व चिकाटी कायम ठेवल्यास आपण आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहचू शकतो. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते. जेव्हा एखाद्याच्या पदरी निराशा आली तर तो व्यक्ती नशेच्या आहारी जातो. पण एखादे व्यसन केल्याने आपला प्रश्न सुटत नाही तर तो आणखी वाढतो व कुटूंबात कलह निर्माण होतात. नैराश्यातून त्याचे जीवन उद्धवस्त होते. त्यामुळे नशेच्या आहारी जाणे टाळले पाहिजे. एखाद्या ठिकाणी जॉबला जातांना विद्यार्थी त्याठिकाणी रिजेक्ट का होतात. मुलांमध्ये मनात प्रचंड भिती असते. त्यामुळे मुले संवादामध्ये कमी पडतात. इंग्रजी बोलतांना तारांबळ उडते व विद्यार्थ्यांच्या पदरी घोर निराशा येते. विद्यार्थ्यांनी शिकत असताना संवाद कौशल्य वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.