ध्वजदिन निधी संकलनाचे धुळ्यात शुक्रवारी उद्घाटन

0

धुळे (प्रतिनिधी) – ध्वजदिन 2016 निधी संकलनाचा शुभारंभ शुक्रवार 9 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11.30 वाजता माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृह, संतोषी माता मंदिर चौक, धुळे येथे होणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) प्रांजळ जाधव यांनी कळविले आहे. मेजर (नि.) श्री. जाधव यांनी म्हटले आहे. दरवर्षी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिवसापासून सर्व राज्ये आजी- माजी सैनिकांच्या कल्याणासाठी जनतेकडून निधी गोळा करतात. जनतेने सैनिकांप्रती त्यांनी केलेल्या त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होईल. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस., निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी जिल्ह्यातील युध्द विधवा, वीरमाता, वीरपिता यांचा सत्कार, माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा शिष्यवृत्ती देवून सत्कार केला जाणार आहे.