जळगाव। तालुक्यातील नंदगाव येथे मागील काही दिवसांमध्ये सुसाट वेगाने दुचाकी चालविण्यार्यांचे प्रमाण वाढले आहे. वेगात वाहन चालविण्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणाचा फटका सामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. अतिवेगात वाहन चालवणे तसेच वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत निष्काळजीपणे वाहन चालवणे यांमुळे नंदगावात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
यात विशेषतः तरूणाईचा समावेश जास्त आहे. नुकतेच एका दुचाकीस्वाराने एका लहान मुलाला धडक दिल्यामुळे तो जखमी झाल्याची घटना घडली आहे. बारावीच्या परिक्षेच्या काळात कानळदा रस्त्यावर नंदगावच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर दहावीच्या परिक्षेच्या काळात सोनवद रस्त्यावरही नंदगावच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता. या दोन्ही घटनेत विद्यार्थ्यांना जबर मार बसला तर दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मागील पाच दिवसांमध्येही गावात तीन चार दुचाकीस्वारांनी किरकोळ अपघात केल्याची घटना घडली आहे. जोरात वाहन चालविणार्या दुचाकीस्वारांविषयी गावकर्याकडून संताप व्यक्त केला
जात आहे.