नंदुरबार । जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य तयारी पूर्ण केली होती. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारून देखावे तयार केले आहेत. घरातील गणपतीसाठी देखील मखर, पताका, सजावटीचे साहित्य खरेदीकडे भाविकांचा कल दिसून आला. शहरातील एकलव्य विद्यालयाचा परिसर तसेच धुळे रस्त्यावरील स्टेट बँक परिसरात गणेश मुर्ती विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स लावण्यात आलेले होते. तसेच शिवाजी रोडवर अनेक गणपती कारखाने असल्याने मंडळांतर्फे नोंदणी केलेल्या गणेश मुर्ती नेण्यासाठी या रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली होती. यंदा साडूच्या मातीच्या गणेश मुर्ती घेण्याकडे भक्तांचा कल दिसून आला. यासोबतच गणेशोत्सवासाठी लागणारग सजावटीचे सामान व पुजा साहित्य यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेली होती. परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
बैलगाडीवर काढली मिरवणूक
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा विसरवाडी,खांडबारा येथे श्री ची स्थापना उत्साहात झाली. ग्रामीण भागात ही यंदा गणेश उत्सव उत्साहात असल्याचे चित्र असुन ग्रामीण भागात बैलगाडीवर गणपती बाप्पाची मिरवणुक काढुन स्थापना करण्यात आली आहे. गणेश उत्सवाचा पाश्वभुमीवर शांतता कमेटीची बैठक झाली असुन प्रशासन सज्ज झाले आहेत.
रिमझीम पावसात बाप्पाचे आगमन
नवापूर शहरात गणपती बाप्पाचे ढोल ताशाचा गजरात स्वागत करण्यात आले. पावसाची रिमझीम बरसातीत बाप्पाला वेलकम करण्यात आले. सकाळी सर्व प्रथम श्री शिवाजी हायस्कुल गणेश मंडळाची श्रीची स्थापना करण्यात आली. सकाळी सराफ गल्लीतील लक्ष्मी नारायण मंदिर येथुन पुजेचा मुर्तीची विधीवत पुजेनंतर मुलींचा लेझीम नृत्याने मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीतील शिस्तबध्द लेझीम नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले होते. गणपती मंदिरयेथुन अनेक गणेश भक्त पुजा करुन घरी स्थापना करत होते. श्रीस्थापनेसाठी भटजीची कमतरता जाणवत होती. भटजी कमी असल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. श्री शिवाजी हायस्कुल गणेश मंडळाच्या विद्यार्थीनींनी मिरवणुकीत लेझीम खेळून रंगत आणली होती.
मुर्ती खरेदीसाठी झुंबड
मानाचा दादा, बाबा, मामा, काका, तात्या, त्रिनेत्र स्वामी विवेकानंद आदि मंडळानी उत्साहात श्री ची स्थापना केली. पावसात ही गणेश भक्त बाप्पाचे स्वागत करत होते. दरम्यान, मुर्ती खरेदीसाठी झुंबड उडाली होती. लहान मोठे सर्वच मुर्त्या विक्रीला गेल्याने लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. तर या माध्यमातुन सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार बाप्पाने दिला आहे. मेनरोडवर पोलीस बंदोबस्त नसल्याने मिरवणुकीतुन वाहन चालक आपले वाहन पुढे नेत होते. याठिकाणी वाहन मोठ्या प्रमाणावर जमा होऊन ट्राफीक जाम झाले होते. याबाबत गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाहतुक शाखेतर्फे नियोजन
नंदुरबार शहरात 25 ते 5 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव व वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार्या मिरवणूक लक्षात घेवून शहर वाहतुक शाखेचे पालीस निरीक्षक गिरीश पाटील यांनी वाहतुक नियोजन केले आहे. वाहतुकीची कोंडी हावू नयेयासाठी शहर वाहतुक शाखा नियोजनबद्ध रित्या प्रयत्न करीत आहे. शिवाजी रोड येथून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या आणि यासारख्या श्रीच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या प्रचंड गजरात गणपती बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी 2 वाजेपासून गणपती स्थापनेच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला होता. त्या सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या. शहरातील प्रथम मानाचे दादा व बाबा गणपतींची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली. ढोल ताशांच्या गजर, गुलालाची उधळण करीत उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणुका निघाल्या होत्या.