प्रशासनातर्फे नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नंदुरबार: जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण वाढत आहे. विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी नंदुरबार शहरातील मुख्य प्रवेशद्वार समजले जाणारे धुळे चौफुलीवरील मुख्य प्रवेशद्वार बॅरिकॅडींग करून बंद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 68 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या आठवडाभरापासून दररोज रुग्ण वाढतच आहेत. अनेक रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास हायरिक्स भागातील असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील धुळे चौफुलीवरील मुख्य प्रवेशद्वार बॅरिकॅडींग करून बंद करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे जाणता राजा चौक, महेश स्तंभ चौक, सी.बी पेट्रोल पंप परिसर, संत सेना चौक, करण चौफुली, धानोरा रस्त्यावर बॅरिकॅडींग करण्यात आलेले आहे. जेणेकरून वाहनांना प्रवेश करता येणार नाही व गर्दी कमी होण्यास मदत होईल. नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.