नंदुरबार । नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन असून वेगवेगळ्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवून सेवा देणार असल्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यासाठी कालच नंदुरबार येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून दीड लाख रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी मानली पाहिजे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील कुपोषण आणि सिकलसेल सारख्या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी मोठी मदत होणार आहे, असे ना. रावल यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
जनप्रतिनिधी व अधिकार्यांची उपस्थिती : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहरण समारंभ ना. रावल यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्तू चौरे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, अपर जिल्हाधिकारी (गार्हाणे) विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे, तहसिलदार नितीन पाटील, स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
विविध गुणवंतांचा सन्मान
याप्रसंगी पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस हवालदार प्रदीपकुमार बेडसे, रविंद्र पाटील, रविंद्र खैरनार यांचा पोलीस महासंचालक यांच्याकडून पोलीस विभागात उलेखनिय सेवेबद्दल तर मोहन तांबोळी, क्राईम फोटोग्राफीमध्ये महाराष्ट्रात सुवर्णपदक तर भारतात चौथा क्रमांक व हेमंत बारी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श तलाठी पुरस्कार 2016 विनायक गावीत, चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या वैष्णवी साळी यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने गुणवंत खेळाडूना जिल्हा क्रीडा पुरस्कार-2016-17 रोहीणी कोकणी (व्हॉलीबॉल) व भूषण चित्ते (थलेटीक्स-हातोडा फेक) यांना रोख रक्कम रुपये प्रत्येकी 10 हजार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र रावल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
तब्बल 436 शेततळ्यांचे काम
चालू आर्थिक वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यासाठी 1 हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च अखेर तब्बल 436 शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून त्यावर 214 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. फळबाग लागवड कार्यक्रमासाठी 2 हजार हेक्टरचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत 550 हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील 2 हजार 880 शेतकर्यांना 1 कोटी 48 लाख रुपयांचा लाभ होणार आहे. शेतकर्यांना बागायती पिके घेता यावीत म्हणून राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे, असे ना. रावल म्हणाले.
’रंगावली’ ठरणार आदर्श
लोकसहभागातून रंगावली मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचा उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या जीवाभावाचा प्रश्न हाती घेतला आहे. हा उपक्रम देशात आदर्श ठरणार आहे असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. नवापूर तालुक्यातील रंगावली मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी केले. नवापूर तालुक्यातील रंगावली नदी पात्रातील गाळ काढण्याचा कामाचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. रंगावली मध्यम प्रकल्प 60 टक्के गाळने भरलेले असल्यामुळे गाळ काढणे आवश्यक असून या उपक्रमास सरकार आणि शासन आपल्या पाठीशी असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.