नंदुरबार । महाराष्ट्रात कोणत्याही नगरपालिकेत झाले नसेल, असे काम आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारात करून दाखविलं आहे. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलल्याचे चित्र आपण पाहिले. म्हणून नगरपालिका निवडणुकीत विकासाला साथ द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्नाताई रघुवंशी यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
.. हे फसवणुकीचे सरकार- खा. चव्हाण
राज्यात 13 हजार शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. कर्जमाफीच्या घोषणेला सहा महिने उलटले तरीही शेतकर्यांची कर्जमाफी झाली नाही. म्हणून राज्यात फडणवीस सरकार नव्हे फसवणुकीचे सरकार आहे, अशी खोचक टिका खा.अशोक चव्हाण यांनी केली. स्थानिक विकासावर बोलतांना ते म्हणाले की, राज्यात एकाही नगरपालिकेने केला नसेल इतका विकास नंदुरबार नगरपालिकेने केला आहे. त्यामुळे विकासकाम करणार्या आ.रघुवंशी यांना साथ द्या व कॉग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन खा.अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेतून केले. तत्पूर्वी माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही मार्गदर्शन केले.
गुजरातच्या प्रचारावर भाष्य
शहरातील ईलाही चौकात शुक्रवारी ही सभा घेण्यात आली. खासदार चव्हाण म्हणाले की,, नजीकच्या गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपाला हलवून सोडले आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान यांना पन्नास सभा घ्यावा लागल्यात. तेवढेच नव्हे तर 12 राज्यातील मुख्यमत्र्यांनाही गुजरातमध्ये तळ ठोकला आहे, असे असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरपालिकेच्या प्रचाराला येतात, ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले.