नंदुरबार : भाजीपाल्याच्या गाडीत दारुची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या नंदुरबार येथील दोन जणांना गुजरात राज्यातील तापी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडून कारवाई केली. नंदुरबार येथून एका बोलेरो गाडीत भाजीपाला भरून तो गुजरातला नेला जात होता. त्यात विदेशी दारू देखील होती. याची खबर तापी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक डी. एस. लाड यांना मिळताच त्यांनी सोनगड येथे चेक पोस्ट वर पथकाचा सापळा रचला. यावेळी संबंधीत गाडी येताच तिची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यात भाजीपाला बरोबरच बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा देखील आढळून आला. या प्रकरणी मनोजभाई भगवानभाई माळी आणि क्लिनर चंद्रशेखर प्रतापभाऊ माळी यांना पोलिसांनी एम एच-39 एडी -0385 बोलेरो पिकअप वाहनसह ताब्यात घेतले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनां नुसार तापीचे पोलिस अधीक्षक एन.एन. चौधरी आणि पोलिस उपअधीक्षक व्यारा यांनी संपूर्ण जिल्ह्यात तपासणी सुरू केली आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली.