नंदुरबारमध्ये आमसूलने आदिवासींची चव केली कडू

0

नंदुरबार – पिढ्यांपिढ्यापासून सातपुड्यातील आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी मोठा आधार ठरलेल्या आमसूल व्यवसायाने यंदा आदिवासींच्या पदरी निराशाच आली आहे. निसर्गाच्या कृपेमुळे यंदा हंगाम चांगला झाला असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत आमसूलला निम्मेच भाव मिळाल्याने आमसूलचा गोडवाच हरविल्याचे चित्र आहे.

सातपुड्यात दोन लाखांहून अधिक गावरान आंब्यांची झाडे आहेत. याशिवाय आदिवासी उत्थान कार्यक्रम व इतर माध्यमातून तीन लाखांहून अधिक आंब्यांच्या झाडांची नवीन लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात आंब्याचे मोठे उत्पन्न येते. या भागात आदिवासींना कुठलाही रोजगार नसल्याने आंब्याच्या कैरीपासून येथील आदिवासी आमसूल बनवितात. दरवर्षी एप्रिल ते जून या भागातील आदिवासींचा मुक्काम आंब्याच्या झाडाखालीच असतो. अख्खे कुटुंब कैरीपासून आमसूल बनविण्याच्या कामात व्यस्त असते. आमसूलपासून मिळणारे उत्पन्न हे आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनते.

व्यापार्‍यांचा कमी भाव
यावर्षी आंब्याच्या हंगाम चांगला आला. ऐन बहराचा काळात वादळवारा नसल्याने मोहरही चांगला बहरला होता. परिणामी आंब्याचे उत्पन्नही चांगले आले. त्यामुळे आमसूलचे उत्पादनही वाढले. यावर्षी सातपुड्यात जवळपास पाच हजार क्विंटलहून अधिक आमसूल तयार करण्यात आले असून येथील आदिवासींनी तो स्थानिक व्यापार्‍यांकडे विकला, परंतु सुरुवातीला अतिशय कमी म्हणजे जेमतेम 40 ते 60 रुपये प्रति किलो भाव मिळाला. पुढे काही प्रमाणात वाढून तो जास्तीत जास्त 120 रुपये किलोपर्यंत गेला. हा भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत 40 टक्केंपर्यंतच होता. गेल्यावर्षी चांगल्या मालाला 250 ते 300 रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला होता. पण यंदा भाव न मिळाल्याने उत्पन्न येवूनही आदिवासींच्या नशिबी निराशाच आली आहे.