नंदुरबारला डॉ. हिना गावित यांनी दुसर्‍यांदा मारली बाजी

0

95 हजाराने मताधिक्य घेत विजयी
नंदुरबार :
अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अटीतटीच्या लढतीत नंदुरबार लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी दुसर्‍यांदा बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांचा पराभव करत डॉ. हिना गावित यांनी 10 हजाराहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळविला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या समोर काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी चांगलेच आव्हान उभे केले होते. मात्र, निकालाअंती अखेर ते फेल ठरले.

पाचव्या फेरीपासून विजयाकडे घोडदौड
23 मे रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीच्या प्रारंभीपासून काँग्रेसचे उमेदवार के.सी.पाडवी यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केली होती. तिसर्‍या फेरीअखेर पाडवी सुमारे 15 हजार मताधिक्क्याने आघाडीवर होते. त्यामुळे भाजपच्या गोटात कमालीचा सन्नाटा पसरला होता. मात्र, चौथ्या फेरीत बाजी पलटली आणि के.सी.पाडवी यांचे मताधिक्य कमी झाले. दरम्यान भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी पाचव्या फेरीपासून मताधिक्य घेत विजयाकडे घोडदौड सुरू केली. पाचव्या फेरीपासून वाढलेले मताधिक्य अखेरपर्यंत वाढतच राहिले. अखेर 95 हजाराने मताधिक्य घेत डॉ. हिना गावित यांनी विजय मिळविला.

डॉ.हिना गावित यांचा मताधिक्य घेत विजय
नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना 6 लाख 39 हजार 135 तर काँग्रेसचे उमेदवार के.सी.पाडवी यांना 5 लाख 43 हजार 507 मते मिळाली आहेत. खा. हिना गावित यांनी 95 हजार 628 असे मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. निवडणुकीतील इतर उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी रेखा सुरेश देसाई 11 हजार 466, डॉ. सुशील सुरेश अंतुर्लीकर 25 हजार 702, कृष्णा होगा गावित 4 हजार 438, संदीप अभिमन्यू वळवी 2 हजार 196, अजय करमसिंग गावित 4 हजार 497, अर्जुनसिंग दिवानसिंग वसावे 2 हजार 936, अशोक दौलतसिंग पाडवी 4 हजार 930, आनंदा सुकलाल कोळी 7 हजार 185, डॉ. सुहास नटावदकर 13 हजार 120, आणि नोटा 21 हजार 925 अशी मते मिळाली आहेत.