नंदुरबारला लवकरच विद्युतीकरणासाठी निधी

0

नंदुरबार । वि द्युतीकरणासाठी केंद्राकडून 100 टक्के निधी मिळणार असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व गांवे, वाड्या-पाड्यांवर विद्युतीकरण करण्यासाठी संबधित विभागाने अचूक आराखडा सादर करावा, विद्युतीकरणापासून एकही गांव, वाडा-पाडा वंचित राहू नये, अशा सूचना खासदार डॉ. हिना गावीत यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजीमंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावीत, नगरपालिका नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जे.बी. पठारे, समितीचे अशासकीय सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया, सविता जयस्वाल, शहादा शहादा, अक्कलकुवा, पंचायत समिती सभापती,व विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

रस्त्यांची कामे त्वरीत पूर्ण करा
खासदार डॉ. हिना गावीत यावेळी बोलतांना म्हणाल्या की, प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेती अपूर्ण किंवा काही कारणास्तव रखडलेली रस्त्यांची कामे त्वरीत पूर्ण करावीत. उज्वला योजनेसाठी जिल्ह्यातील बँकांमध्ये प्रत्येक महिलेचे खाते उघडावे जेणेकरुन या योजनेचा लाभ जिल्ह्यातील महिलांना घेता येईल. भारत संचार निगम लि. विभागाने इंटनेटच्या वापरासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार ब्राँडबॅण्ड जोडणी उपलब्ध करुन द्यावी. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी लोकेशन आहेत त्याठिकाणी मोबाईल थ्रीजी टावर उभारण्यात येणार आहेत. येत्या काळात जिल्ह्यात डायलेसेस सेंटर उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील कुपोषण 100 टक्के कमी कसा करता येईल त्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावे.

ग्रामीण रूग्णालयात विद्युत जोडणी द्या
आमदार डॉ. विजयकुमार गावीत यावेळी बोलतांना म्हणाले, धडगांव तालुक्यातील तसेच इतर दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालयात विद्युत जोडणीसाठी लागणारे आवश्यक ते फॉर्मस संबंधित विभागाने उपलब्ध करुन तात्काळ विद्युत जोडणीचे कामे पूर्ण करावीत, निधी वितरीत करुन ज्या रस्त्यांची कामे झालेली नाही अथवा अपूर्ण असतील अशा ठेकेदारांची नांवे काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी अधिकार्‍यांना दिल्यात.

केंद्राच्या विविध योजनांवर चर्चा
या बैठकीत केंद्र पुरस्कुत योजनांचा सन 2017-18 मधील माहे जुलै-2017 अखेर विकास कामांचा आर्थिक व भौतिक आढावा घेण्यात आला. यामध्ये स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, आदिवासी विभागाकडील योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय सामाजिक अर्थ सहाय्य योजना, राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना, अन्नपूर्णा योजना, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, या योजनावर खासदार डॉ. हिना गावीत यांनी चर्चा करुन आढावा घेतला.

अधिकार्‍यांनी समन्वय ठेवावा
समिती सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया यांनी यावेळी वीज कनेक्शन, विद्युत ट्रान्सफार्मर, रस्त्यांची कामे, आरोग्य, शिक्षण, शौचालये, रोहयोची कामे, पोषण आहार आदी विषयांवर विविध मुद्दे उपस्थित करुन त्यावर संबंधित विभागाने काय कारवाई केली याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यावेळी म्हणाले, फॉरेस्ट विभागाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ज्या रस्त्यांची कामे ना-हरकत प्रमाणपत्रामुळे थांबली असतील त्याबाबततात्काळ पाठपुरावा करुन कामे सुरु करावी. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या योजना जिल्ह्यात राबवितांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी सर्व अधिकार्‍यांनी योजनांची अंमलबजावणीसाठी आपापसात समन्वय ठेवून योजना वेळेत पूर्ण कराव्यात, अशा सूचना दिल्यात.