नंदुरबार: महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला परराज्यातील 14 लाख 32 हजार रुपये कींमतीचा बेकायदेशीर बिअरचा साठा जप्त करण्यात आला आहे. नंदुरबार येथील दारूबंदी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 26 फेब्रुवारीच्या रात्री अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विभागाचे निरीक्षक संजय परदेशी, दुय्यम निरीक्षक शैलेंद्र मराठे यांचे पथक गस्तीवर होते. यावेळी नंदुरबार नवापूर रस्त्यावरील खामगावच्या शिवारात कंटेनर संशयितरित्या जात असताना त्याची तपासणी करण्यात आली. त्यात विविध प्रकारच्या बिअरचा मोठा साठा आढळून आला, त्याची किंमत सुमारे 14 लाख 32 हजार 192 रुपये इतकी आहे. या प्रकरणी राजस्थान मधील पुष्पेंद्रसिंह प्रभू सिंह चौहान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.