नंदुरबार। खान्देशातील जिव्हाळ्याचा आणि भाऊबंधुंना एकत्र आणणारा कानुमाता उत्सव रविवारी साजरा होत आहे, यासाठी नंदुरबार शहरासह जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे, घराघरात रोट बनवले जाणार असल्याने बाहेर गावाला नोकरीनिमित्त गेलेले परिवारातील सदस्य या निमित्ताने गावी येऊ लागले आहेत. श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. हा एकमेव असा उत्सव आहे की, यानिमित्ताने दुरावलेले भाऊबंद एकत्र येत असतात. सगळे मिळून कानबाईचा प्रसाद म्हणजेच रोट खात असतात, अश्या या पारंपरिक सणाची घराघरात तयारी सुरू आहे, शनिवारी सप्तया पूजन, रविवारी कानुमातेची स्थापना केली जाणार आहे.
सणाच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन : याच रात्री रोटचे दळन जात्यावर सर्व मिळून दळत असतात, रात्रभर कानबाई मातेचे गुणगान गाणारे गीत म्हणून जागरण केले जाते, कण्हेरीला खान्देशात फार महत्व आहे. काही गाण्यांमधे कण्हेरीलाच कानबाई संबोधलं जाते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जाते (ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) कटाची आमटी, लाल भोपळ्याची(डांगराची) भाजी, पापड, भजे हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात.आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.दुसर्या दिवशी सोमवारी सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते.
आरती करून नदीत होते विसर्जन
कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेऊन बायका नदीवर निघतात. यावेळी दर्शनासाठी कानबाईचा झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. नदीवर पुन्हा एकदा आरती होऊन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. असा हा उत्सव रविवारपासून साजरा होतोय.