भुसावळ : नंदुरबारातील 48 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी अहवालाअंती निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण नंदुरबार जिल्हा हादरला असल्याची घटना ताजी असतानाच हा रुग्ण भुसावळातदेखील नातेवाईकांना भेटीला आल्याची माहिती भुसावळ पोलिस दलाला शनिवारी दिवसा कळाल्यानंतर भुसावळातील प्रशासन पुरते हादरले आहे. या रुग्णाच्या मोबाईल लोकेशनवरून भुसावळातील जुन्या पालिका परीसरातील हॉटेल कन्हैय्याकुंज परीसरासह जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी तसेच शहरातील अन्य काही भागात या रुग्णाची ट्रॅव्हल्स हिस्ट्री समोर आल्याने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिस व आरोग्य प्रशासनापुढे उभे राहिले आहे.
कोरोनाबाधीत रुग्णाचा भुसावळात प्रवास ?
समजलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल शुक्रवारी रात्री प्रशासनाला प्राप्त झाला होता शिवाय हा इसम भुसावळातही आल्याची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाला प्राप्त झाल्याने शनिवारी भुसावळ पोलिसांना मिळाल्यानंतर रुग्णाच्या मोबाईल हिस्ट्रीवरून पोलिसांनी रुग्ण व त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास शनिवारी दिवसभर सुरूवात केली होती. प्राथमिक माहितीनुसार भुसावळातील जुन्या पालिकेसमोरील हॉटेल कन्हैय्याकुंज परीसर, जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी परीसर तसेच शहरातील अन्य काही भागात हा रुग्ण नातेवाईकांच्या भेटीसाठी गेल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र त्यास प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही त्यामुळे ही बाब भुसावळकरांच्या उरात धडकी भरण्यासारखीच आहे. आतापर्यंत भुसावळातील एकालाही कोरोनाची लागण झाल्याचे उदाहरण नाही मात्र आता थेट नंदुरबारातील रुग्णाने भुसावळात भेट दिल्याने भुसावळकरांची चिंता वाढली असून आतातरी नागरीकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘त्या’ 26 पोलिसांना होम कॉरंटाईन
नंदुरबारात कोरोनाची लागण झालेला 48 वर्षीय रुग्ण हा पोलिसांच्या संपर्कात आल्याची माहिती असून सतर्कता म्हणून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सुमारे 26 पोलिसांना सतर्कता म्हणून होम कॉरंटाईन करण्यात आल्याचे समजते मात्र त्यास अधिकृतरीत्या दुजोरा मिळू शकलेला नाही.