नंदुरबार- शहर पोलिस ठाण्यात येऊन 15 ते 20 तरुणांनी धुमाकूळ घालत एका पोलिस कर्मचार्याला धक्काबुकी करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून वारंवार मारहाण होत असल्याने पोलिस कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मोबाईल रिचार्ज करण्यावरून उदभवलेला वाद गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात आला होता. फिर्याद देण्या-घेण्याच्या कारणावरून तरुणांच्या गर्दीने पोलिस कर्मचारी योगेश लोंढे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. यावेळी त्या तरुणांनी लोंढे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस कर्मचार्यांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद स्वतः योगेश लोंढे या पोलिस नाईकने दिली आहे, त्यानुसार गौतम मंगलसिंग खैरनार, गोविंद सामुद्रे,गोपी सामुद्रे यांच्यासह 15 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी नसल्याने अशा लोकांचे चांगलेच फावत आहे. वारंवार पोलिस कर्मचार्यांवर हात उचलण्याची मजल होत असल्याने पोलिस कर्मचार्यांचे मनोधैर्य खचत आहे. एक प्रकारे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.