नंदुरबार। रस्ता लूट प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींना अटक केली असून या लुटारूच्या टोळीत ग्रामपंचायतीच्या एका शिपायाचा देखील सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीने ७ ठिकाणी लुट केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे.
तळोदा नंदुरबार रस्त्यावर व्यापाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिसांपुढे देखील आव्हान होते. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील विधान परिषदेत याबाबत लक्ष वेधी मांडली होती. दरम्यान पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून रस्ता अडवून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीतील १० जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर नवले आदी उपस्थित होते.