नंदुरबारात वादळापुर्वीची शांतता

0

आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेसचा गट सज्ज झाला आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच शहरात विविध विकास कामांचा धुमधडाका सुरू असून या कामांच्या माध्यमातून सत्ताधारी काँग्रेस नेतृत्वाने विरोधकांना सुन्न केले आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या आव्हानाला विरोधक कसे तोंड देतात हे औत्सुकतेचे ठरणार आहे. नंदुरबार नगरपालिकेत गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे. विधानपरिषदेचे सदस्य आ.चंदक्रंत रघुवंशी यांनी नगरपालिकेवर आपली पकड मजबूत ठेवली असून विरोधकांनाही आरोप करण्यासाठी जागा ठेवलेली नाही. राज्यात सर्वत्र भाजपाची सत्ता असली तरी नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला ऊर्जा देण्याचे काम आ.रघुवंशी यांनी केले आहे. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेतेही आ.रघुवंशीच्या कार्याचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही. आपल्या या कृतीशील कार्याच्या जोरावरच आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आ.रघुवंशी व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. राजकीय हालचाली गतीमान होवू लागल्या आहेत. आपल्यासमोर कुणीही पक्ष निवडणूक लढो आपण सज्ज होसून त्याचा प्रचारही सुरू केल्याचा दावा आ.रघुवंशी यांनी केला आहे. त्यादृष्टीने शहरातील रस्ते, बगीचे, चौफुल्यांवर सुशोभिकरण, विद्युत पथदिवे, सर्वसामान्य नागरिकांच्या गल्लीबोळातील रस्त्यांची कामे, उद्यान स्वच्छता, पाण्याचे नियोजन यासारख्या कामांना आकार देवून शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. याच विकासात्मक कामांचा आरसा जनतेसमोर मांडून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न होणार आहे. एकीकडे सत्ताधारी काँग्रेस गटाची ही जमेची बाजू असलेली तरी विरोधक असलेले भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी या पक्षातील नेत्यांसह पदाधिकारी मात्र कमालीचे सुन्न दिसत आहेत. विरोधकांमध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या राजकीय हालचाली होतांना दिसून येत नाही. ना बैठका, ना चर्चा, ना कार्यक्रम, ना कार्यक्रम, ना पत्रकबाजी सारे काही शांततेचे वातावरण दिसत आहे. असे असले तरी हिरा उद्योग समुहाचे चेअरमन तथा अमळनेरचे आ.शिरीष चौधरी यांचे ज्येष्ठ बंधू रवींद्र चौधरी यांचा गट आ.रघुवंशीसमोर निवडणुकीत उभा राहणार, अशी चर्चा गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. परंतु या गटातील नेतृत्वाने अजून कोणत्याच पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे सारी काही संभ्रामवस्थेचे वातावरण आहे.

भाजपाचे आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाध्यक्षा तथा खा.हिना गावीत या मातब्बर नेत्यांनीही मौन बाळगल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण बनले आहे. नगरपालिका निवडणुकीत जनतेसमोर बोलतांना विरोधकांकडे एकही मुद्दा नाही, अशी विकासाची कामे आपण केल्याचा दावा आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा आहे. हे खरे असले तरी अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी काँग्रेस गटाला अडचणी आणणारे मुद्दे असतील, पण ते शोधण्याची मानसिकता विरोधकांमध्ये सध्या तरी दिसून येत नाही. पालिका निवडणुकांना अवघ्या पाच महिन्याचा कालावधी उरला आहे. या कालावधीत विविध विकासकामांवर जोर देवून आ.रघुवंशी यांच्या नेतृत्वाने अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून या आधारावरच निवडणुकीत रंग भरला जाणार आहे. आ.रघुवंशी यांच्या विरोधातील सध्याचे वातावरण कमालीचे शांत असले तरीही वादळा पुर्वीची शांतता असू शकते. निवडणुकीत रात्रीतून काय-काय राजकीय घडामोडी होतात, हे पाहणे नंदुरबारकरांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

– रवींद्र चव्हाण,
नंदुरबार 9423194841