नंदुरबार- दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याच्या कारणावरून येथील प्रभाग क्रमांक 10 ’अ’च्या शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी अर्जुन मराठे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आदेश दिले आहेत. शासनाच्या आदेशानुसार 12 सप्टेंबर 2001 नंतर दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास निवडणुकीत उभे राहता येत नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यानंतरही शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी अर्जुन मराठे यांनी याविषयी प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दिली. त्यांच्याविरोधात भाजपच्या पुष्पाबाई विठ्ठल चौधरी यांनी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे 19 जानेवारीला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली. सुनावणीत नगरसेविका मराठे यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले. पालिकेत आता शिवसेनेचे संख्याबळ तीनवर आले आहे. आणखी चार ते पाच नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे.