नंदुरबारात 14 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी

0

नंदुरबार । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र 14 हजार 111 शेतकर्‍यांना 45 कोटी 36 लाख 40 हजार 699 रुपयाचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी दिली आहे. 2012-13 ते 2015-16 या संलग 4 वर्षात राज्यात व जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप/रब्बी हंगामात बहुसंख्य गावातील आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी होती. जिल्ह्यातील काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. परिणामी हे शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे असे शेतकरी बँकेकडुन नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र होऊ शकले नाहीत. या पार्श्‍वभुमीवर राज्य शासनाने अशा थकीत शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यांचे जाहीर केले होते.

एसएमएसद्वारे माहिती
शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या नंदुरबार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांनी राज्य शासनाने पुरविलेल्या 1 ते 66 नमुन्याप्रमाणे ऑनलाईन माहिती भरुन दिली होती. त्यानुसार धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार 111 शेतकर्‍यांना 45 कोटी 36 लाख 40 हजार 699 मात्र रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत मिळाली आहे. याबाबत आतापर्यंत सुमारे 12 हजार संबंधित शेतकर्‍यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवुन कळविण्यांत आले आहे. तसेच धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक मर्या. नंदुरबार जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या निधीचे 100 टक्के निधी वाटप केले आहे.