नंदुरबार आगाराचा लाचखोर वाहतूक नियंत्रक एसीबीच्या जाळ्यात

0

एस.टी.चालकाचे निलंबन टाळण्यासाठी स्वीकारली आठ हजारांची लाच

नंदुरबार- एस.टी.चालकाची किरकोळ रजा मंजूर असताना चालक गैरहजर असल्याचे दाखवून निलंबन टाळण्यासाठी आठ हजारांची लाच मागणार्‍या नंदुरबार आगारातील वाहतूक नियंत्रक नंदकिशोर वसंत शेवाळे (41, रा.वाघेश्वरी मंदिराजवळ, विमल हौसिंग सोसायटी, नंदुरबार) यांना 4 रोजी दुपारी साडेतीन वाजता नंदुरबार आगारातून नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोर अधिकार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

चालकाकडूनच मागितली लाच
नंदुरबार आगारात 20 वर्षांपासून अखंड सेवा करणार्‍या 50 वर्षीय एस.टी. चालकाने एका दिवसाचे किरकोळ रजा टाकल्यानंतर तुम्ही गैरहजर राहिल्याने तुम्हाला निलंबीत करतो, असा दम भरत कारवाई न करण्यासाठी आरोपी नंदकिशोर शेवाळे यांनी 4 जून रोजी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. चालकाने आठ हजारात तडजोड करीत नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोदंवली. एसीबीने लाच मागणीची पडताळणी करीत सापळा रचला. आरोपी शेवाळे यांनी नंदुरबार आगारातच तक्रारदाराला आठ हजारांची लाच देण्यासाठी बोलावल्यानंतर आरोपीने लाच स्वीकारताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे व सहकार्‍यांनी केली.