नंदुरबार जिल्हा उद्योग केंद्राच्या माजी व्यवस्थापकाला अटक

0

शासनाच्या सहा कोटींचे फसवणूक प्रकरण ; नंदुरबार एसीबीच्या पथकाने नाशिकमधून आवळल्या आरोपीच्या मुसक्या

नंदुरबार- जिल्हा उद्योग केंद्रातील सामूहिक प्रोत्साहन योजना 2001 अंतर्गत पदाचा दुरुपयोग करून लाभधारकांनी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या नसताना सरकारी अनुदानाचे वाटप करून शासनाची सुमारे सहा कोटी रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत मुख्य आरोपी तथा नंदुरबार जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक स्वरूपसिंग पाया वसावे यांना बुधवारी नाशिक येथून अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पदाचा दुरूपयोग करून शासनाच्या सहा कोटींची नुकसान
महाराष्ट्र शासनाने उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना 2001 कार्यान्वीत केली होती. ही योजना राबवताना लाभधारक घटकांनी कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या नसतांना आरोपीतांनी संगनमत करून पदाचा दुरुपयोग करून शासकीय अनुदानाचे तब्बल सहा कोटी तीन लाख 14 हजार 832 रुपयांचे नुकसान केले होते. या प्रकरणी चौकशी होऊन चौकशी होवून नंदुरबार शहर पोलीस स्टेशन 18 जानेवारी 2017 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 14/17 भादंवि कलम 420, 465, 468 , 471 , 474, 120 (ब) 109 , 34 सह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे 13 (1) (क) 13 (1)(ड) सह 13(2)अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव, हवालदार महाजन, नाईक चित्ते यांनी पूर्ण केला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तथा माजी महाव्यवस्थापक स्वरूपसिंग पाया वसावे यास बुधवारी नाशिक येथून अटक करण्यात आली. आरोपीस गुरूवारी नंदुरबार न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.