नंदुरबार जिल्हा बार असोसिएशनतर्फे एकदिवशीय काम बंद

0

नंदुरबार । येथील अ‍ॅड. राजेंद्र मोरे व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर ’307’ कलम लावण्याची मागणी करत बार असोसिएशनतर्फे गुरूवारी एक दिवसीय कामकाम बंद करून निषेध नोंदवला. नंदुरबार जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य अ‍ॅड. राजेंद्र मोरे व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. त्यात कुटुंबीय जखमी झाले आहे. या घटनेने जिल्ह्यातील वकिलांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. अ‍ॅड. मोरे यांच्यावरील हल्ला हा सर्व वकिलांवर हल्ला आहे. अ‍ॅड. मोरे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांवर 307 कलम लावण्यासाठी अर्ज दिला असता त्यावर कोणतीही चौकशी करण्यात आलेली नसल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.एम.शर्मा यांनी सांगितले. घटनेने वकिलांचा मनात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनि सुरक्षिततेचा बाबतीत प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. गुरुवार 16 रोजी घटनेचा निषेध म्हणून दिवसभर कामकाम बंद ठेवले. जिल्हाभरात 300 वकीलांनी कामकाम बंद ठेवल्याचे सांगण्यात आले. आंदोलनात असो.चे अध्यक्ष अ‍ॅड.एस.एम. शर्मा, उपाध्यक्ष अ‍ॅड.मनोजकुमार मोरे, सचिव अ‍ॅड.संजय पाटील, दादाभाई पाटील यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदविला.