नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा सील

नंदुरबार : जिल्ह्याच्या धुळे जिल्हा, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याला लागून असलेली सीमा बंद करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. केवळ जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, वैद्यकीय परीक्षा, पूर्वनियोजित परीक्षा, नोकरीच्या ठिकाणी रुजू होणे या कारणांसाठी नागरीकांना प्रवेशासाठी मुभा असेल. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे आणि 72 तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे व बंदोबस्तावरील अधिकार्‍यांना दाखविणे आवश्यक असेल. अशा व्यक्तींसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा रॅपीड अँटीजन चाचणीची व्यवस्था करेल. अहवाल निगेटीव्ह आल्यास प्रवेश देण्यात येईल.

अत्यावश्यक कामांना मिळणार इंधन
जिल्ह्यात लॉकडाऊन असले तरी सार्वजनिक कामे, शासकीय रस्ते, आरोग्यविषयक सोई यासंबंधिची कामे सुरू राहतील. कामावरील मजूरांची व्यवस्था कामाच्याच ठिकाणी करण्यात यावी. ग्रामीण भागातील पेट्रोल पंप केवळ वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, शासकीय वाहने, शेतीविषयक सर्व कामांसाठी पेट्रोल व डिझेल वितरीत करतील. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून शेतीविषयक सर्व कामे सुरू राहतील. जिल्ह्याच्या सीमेवरील भागात राहणार्‍या इतर जिल्ह्यातील व्यक्तींना शेतीविषयक कामासाठी तहसिलदार ओळखपत्र देतील.

शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू
पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शनिवार व रविवारी जनता कर्फ्यु राहील. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी सुचनांचे उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.