घटनेमुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण; पोलीसात गुन्हा दाखल
नंदुरबार । जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा, शहादा येथून 3 महिलांसह 2 पुरुष बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलीस ठाण्यांमध्ये हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. नंदुरबार शहरातून ज्ञानदीप कॉलनीतील शोभा किशोर कुवर (35) ह्या 3 सप्टेंबर पासून कोणास काही एक न सांगता घरून निघून गेली असून त्या अद्यापर्यंत घरी परतलेल्या नाहीत म्हणून किशोर कुवर यांनी शहर पोलिसात हरविल्याची नोंद केली.
पोलीसांकडून तपास सुरु
तापी ( गुजरात ) जिल्यातील निझर येथील रविना पूजाभाई पटेल (22) ही तरुणी 7 रोजी नंदुरबारातील साईदीप रुग्णालय येथून गावात काम आहे असे सांगून गेली असता परत आली नसल्याने पूजाभाई पटेल यांनी नंदुरबार शहर पोलिसात हरविण्याची नोंद केली. तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील योगेश भिकन मराठे (35) हा 3 रोजी पैसे घेऊन येतो असे सांगून गेला मात्र घरी परतलेला नसल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. या प्रकरणी त्याचे वडील भिकन मराठे यांनी तळोदा पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद केली आहे. शहादा येथील लोणखेडा चौफुली परिसरात राहणारे भटू नामदेव साळी (72) हे 4 रोजी काहीही न सांगता निघून गेल्याने घनश्याम साळी यांनी शहादा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. शहादा येथील शितल रघुनाथ शिंपी (20) 1 रोजी बेपत्ता झाली आहे याप्रकरणी रघुनाथ अशोक शिंपी यांनी पोलीसात नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोनवणे, पोहेकॉ वळवी, पोहेकॉ.जाधव, पोहेकॉ.पाडवी करीत आहेत.