नंदुरबार। महामार्ग लगतच्या आदिवासी च्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करणारी जमीन माफियांची टोळी सक्रिय झाली आहे. त्यांचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काल पत्रकार परिषदेत बोलतांना दिला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 बी हा तळोदा, अककलकुवा तालुक्यातुन जाणार आहे.त्यासाठी महामार्गालगत जमिनी अधिग्रहण करण्याची प्रकिया सुरू आहे. याचा फायदा घेत काही जमीन माफियांनी गरीब आदिवासींकडून कवडीमोल भावाने जमिनी खरेदीचे षडयंत्र रचले आहे.त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी, स्थानिक महसूल अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे.या अधिकार्यांनी एका दिवसात जमीन खरेदीला परवानगी दिल्याचा आरोप पद्माकर वळवी यांनी केला आहे. जमीन माफियांनी आदिवासीच्या जमिनी बोगस आदिवासीच्या नावे खरेदी करण्याचा घाट घातला असून अशा आदिवासीची देखील आयकर विभागाच्या वतीने चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकार्यांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.