रवींद्र चव्हाण नंदुरबार । शहादा-तळोदा मतदार संघातील भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी आणि नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावीत, खासदार. हिना गावीत यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. विकास कामांच्या श्रेयावरुन भाजपाच्या या जबाबदार नेत्यांमध्ये कलगीतूरा रंगू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या प्रकारामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपात गटबाजी असल्याचे उघड होवू लागले आहे.
सच्चे कार्यकर्ते पक्षापासूंन दुरावत चालल्याची कबुली आ. पाडवी यांनी दिली आहे. खा.गावीत व आमदार डॉ. गावीतांनी येणारी नंदुरबार नगरपालिका निवडणूक जिंकून दाखवावी, तरच तळोदाकडे लक्ष दयावे, असे आव्हान आमदार पाडवी यांनी दिले आहे. येत्या सहा महिन्यात नंदुरबारसह, तळोदा नवापूर नगरपालिकेच्या निवडणूका येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे पक्षीय संघटन करण्याऐवजी लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर बेछुट आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगविला आहे.
आमदार उदेसिंग पाडवी म्हणाले की, शासनाकडे पाठपुरावा करुन मोठ्या प्रमाणांवर निधी तळोदा शहादा मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. परंतू या कामांचे भूमिका अथवा उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावे असा हट्ट खासदार हिना गावीत यांचा आहे. या प्रकारामुळे भाजपाचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत पडले असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच आता हस्तक्षेप करुन आमदार पाडवी आणि आमदार गावीत यांच्यात समेट घडवून आणण्याची वेळ येवून ठेपली आहे.
आमचे कार्यकर्ते म्हणजे डुप्लीकेट !
डॉ.गावीत यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून हा वाद सुरुच आहे. आम्ही आता भाजपवासी झालेले असतांना आम्हाला राष्ट्रवादीचे म्हणून वारंवार हिणवले जाते. आमचे कार्यकर्ते म्हणजे डुप्लीकेट भाजप असा शिक्का मारला गेल्याची व्यथा खासदार हिना गावीत आमदार डॉ. गावीत यांनी मागे बोलताना व्यक्त केली होती. आता पुन्हा तोच वाद उफाळून आल्याने भाजपातील अंतर्गत कलह कोणत्या वहणावरुन नेवून ठेवतो याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. त्यांचा मतदार संघ सोडून आमदार डॉ. विजयकुमार गावीत व खासदार हिना गावीत हे माझ्या मतदार संघात येवून ढलळाढवळ करीत असल्याचा आरोप आमदार पाडवी यांनी केला आहे.