नंदुरबार: नंदुरबार जिल्हा परिषदेवर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. भाजप आणि कॉंग्रेसला समसमान २३ जागांवर विजय मिळाला आहे. शिवसेनेला ७ जागांवर विजय मिळाल्याने सत्तेची चावी शिवसेनेच्या हातात आहे. दरम्यान राज्याच्या धर्तीवर शिवसेना आणि कॉंग्रेस नंदुरबारला एकत्र येण्याची शक्यता आये. त्यासाठीच आज गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत आणि कॉंग्रेस नेते आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण 56 जागा आहेत. निवडणूक निकालानंतर काँग्रेस 23 , भाजपा 23, शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळविला आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी किमान 29 जागांची आवश्यकता आहे. मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने दोन पक्ष एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांना शिवसेनेची साथ घ्यावी लागणार आहे.