नंदुरबार – नंदुरबार नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकपणाचा दावा काँगे्रसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला असला तरी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी गंभीर आरोप करत सत्ताधारी गटाला आव्हान दिले आहे. त्यामुळे चौधरी यांच्या आरोपांचे खंडण आमदार रघुवंशी आता कसे करतील याकडे नंदुरबारकरांचे लक्ष लागले आहे.
फेबु्रवारी महिना संपत आला असून तापमानात थोडी वाढ होवू लागली आहे. निसर्गाचा जसा हा नियम असतो तसा राजकारणाचाही आहे. निवडणूका जवळ आल्या की, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडून राजकीय वातावरण तापवले जाते. सध्या नंदुरबारला असाच अनुभव येत आहे. आगामी नगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर रणनिती आखण्याबरोबरच नगरपालिकेच्या कारभारावर भाजपाने निशाणा साधला आहे. गेल्या पंधरावर्षापासून नगरपालिकेवर काँगे्रसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे मनमानी कारभार करत विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेवून केला आहे.
कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून आखणी
आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठीच आमदार रघुवंशी हे भाजपाच्या नेत्यांशी जवळीक साधून उद्घाटन कार्यक्रमांना बोलविण्याचा प्रयत्न करीत असल्याची तोफ चौधरी यांनी डागली आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला याचे उत्तर देणं भाग असून आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आता काय भूमिका घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान हा राजकारणाचा भाग असला तरी आगामी नगरपालिका निवडणूका लढविण्याचा नगारा वाजविला जात आहे. सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात भाजपाचे पॅनल उभे करून आ.रघुवंशींना कोंडीत करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून आखला जात आहे. त्यासाठी भाजपा आणि शहर विकास आघाडी एकत्र येण्याची चिन्हे दिसून येत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँगे्रस आणि शहर विकास आघाडी एकत्र येवून राष्ट्रवादीशी म्हणजेच आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्याशी टक्कर दिली होती. हिच शहरविकास आघाडी आता काँग्रेसपासून अलिप्त होणार आहे. असे असले तरी भाजपाच्या जिल्हाध्यक्षा तथा खासदार हिना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी मौन बाळगले आहे. भाजपाचा राजकीय शत्रू हा काँग्रेसपक्ष असला तरी आ.गावीत व खा.हिना गावीत हे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात उघडपणे बोलतांना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांनी सावध भूमिका घेत आपले राजकारण सुरु ठेवले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत शहरविकास आघाडी व भाजपा खरच एकत्र येवून आ.रघुवंशींच्या शक्तीला टक्कर देतील का? हा प्रश्न नंदुरबारकरांना आतापासूनच सतावत आहे.