नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

0

नंदुरबार । नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात एक खासदार व तीन आमदार उतरले असून प्रचारासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. यामुळे निवडणुकीच्या राजकीय वातावरणात रंग भरला आहे. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी 13 डिसेंम्बर रोजी मतदान होणार आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून द्यावयाचा असल्याने एक एक मतदार राजाचा भाव वधारला आहे. काँग्रेसच्यावतीनं नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मावळत्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी याच पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्यासह प्रभागातील काँग्रेस उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी कंबर कसली आहे तर दुसरीकडे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रवींद्र चौधरी यांनी उमेदवारी केल्याने ही निवडणूक कमालीची चुरशीची होणार आहे.

निवडणूक वातावरण तापले
डॉ. चौधरी यांच्या विजयासाठी त्यांचे बंधू आ. शिरीष चौधरी, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, यांनी चंग बांधला आहे. त्यांच्यामदतीसाठी आता खा. हिना गावित,आ.डॉ. विजयकुमार गावित हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचे वातावरण हळु हळू ढवळायला लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे, या थंडीच्या वातावरणात निवडणुकीच्या राजकिय गरमागरम चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागल्या आहेत.

राजकीय डावपेजांना वेग
निवडणूक म्हटली म्हणजे राजकिय डावपेच सुरू असतात, त्या दोन्ही उमेदवारांना ब्रेक देण्याचे काही तरी खास कारण असू शकते, त्याचा खुलासा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रोज काही ना काही राजकीय घटना घडत असून त्या घटना थंडीच्या शेकोटीत मोठ्या चवीने चर्चिल्या जात आहेत. सध्या प्रत्येक उमेदवार आप आपल्या प्रभागात फिरून घरोघरी जात प्रचार करतांना दिसत आहे. माघारी नंतर म्हणजे 1 डिसेंम्बर पासून खर्‍या अर्थाने प्रचाराची रणधूमाली शिगेला पोहचणार आहे.

काँग्रेसच्या भूमीकेवर साशंकता
सध्या तर संपूर्ण शहराचे लक्ष माळी वाडा या भागाच्या राजकिय हालचालींवर लागले आहे. याभागातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसचे इच्छुक उमेदवार निंबा माळी व विशाल माळी यांचे ऐन वेळी आश्‍चर्य चकित तिकीट कापण्यात आल्याने ते प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळे आगामी काळात त्यांची भूमिका काय असेल याकडे ही लक्ष वेधले गेले आहे. हे दोन्ही उमेदवार काँगेसचे निकटचे असतांना त्यांना का थांबविण्यात आलं हे अजून रहस्यच आहे