नंदुरबार । काँग्रेस सोबत राहूनच शिवसेना नगरपालिका निवडणूक लढणार आहे. अशी अधिकृत घोषणा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी काँगेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेससोबत सेटिंग केल्याची चर्चा होती. यादृष्टीनेच राजकीय हालचाली सुरू होती. या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सोबत शिसेनेची युती असल्याचे अधिकृत जाहीर केले. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते. विक्रांत मोरे म्हणाले की, स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन नगरपालिका निवडणूक काँग्रेससोबत लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविण्यात आला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने 11 जागांची मागणी केली आहे. त्यात तडजोड होऊन जागा निश्चित करण्यात येतील. प्रचारदेखील सोबतच करणार असून सर्वच जागांवर आम्ही विजयाची पताका फडकविणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, सेनेने 11 जागा मागितल्या आहेत. त्यावर मार्ग काढून काँग्रेस-सेनायुती निवडणूक रिंगणात उतरणार आहे. प्रत्येक प्रभागात दोन जागा आहे. म्हणून एक काँग्रेस चा व एक शिवसेनेचा उमेदवार राहील. हे दोन्ही उमेदवार सारखेच प्रचार करतील, असा दावा आमदार रघुवंशी यांनी केला आहे.