नंदुरबार नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी यांनी पदभार स्वीकारला

0

नंदुरबार । नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष रत्नाताई रघुवंशी यांनी शनिवारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. सुरवातीला आमदार कार्यालयापासून सर्वच नगरसेवक मिरवणुकीने नगरपालिका पर्यंत चालत आले. दरम्यान, नगरपालिकेत विकास कामे करताना सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव आम्ही करणार नाही, अशी ग्वाही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
पदभार स्वीकारल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष रत्नाताई रघुवंशी यांचा सत्कार आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केला. यावेळी बोलताना आ. रघुवंशी यांनी सांगितले की, नगरपालिकेत विकास कामे करतांना सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव आम्ही करणार नाही, परंतु विकास कामामध्ये विरोधकांनी विरोध करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आ.रघुवंशी म्हणाले की,1 मार्च पर्यंत राहिलेले विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नंदुरबार चा पाणी प्रश्‍न कायम सुटावा यासाठी नवीन एक पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंदूरच्या धर्तीवर नंदुरबारला ही साडे नऊ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी नवीन 18 डंपर खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज आभार सभा
नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सह नगरसेवकांच्या आभार सभेचे रविवारी 24 डिसेंबर रोजी सुभाष चौकात आभार सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला नंदुरबारकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे, अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष सह एकूण 39 जागा पैकी काँग्रेस शिवसेना युतीचे 28 नगरसेवक निवडून आले आहेत, या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार व जनतेचे आभार मानण्यासाठी शहरातील सुभाष चौकात रविवारी रात्री 8 वाजता आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला आ.चंद्रकांत रघुवंशी हे मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व नगरसेवकांची उपस्थिती
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून रत्नाताई चंद्रकांत रघुवंशी या निवडून आल्या आहेत. शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारला व कामकाजाला सुरुवात केली आहे, यावेळी काँग्रेस व शिवसेनेचे निवडून आलेले सर्वच म्हणजे 28 नगरसेवक उपस्थित होते. नगरपालिकेजवळील शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पअर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर नगरपालिकेची सूत्रे त्यांनी हाती घेतली.