जिल्हा अध्यक्ष सैय्यद रफत यांची माहिती
नंदुरबार । नगरपालिका निवडणुकीत एमआयएमने देखील ताकदीनिशी भाग घेण्याचे ठरविले असून या पक्षातर्फे निवडणूक लढविणार्या इच्छुकांनी उमेदवारी अर्जासाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष सैय्यद रफत यांनी केले आहे. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणूक साठी काँग्रेस, भाजपा सज्ज झाली आहे. आता एमआयएमने देखील रणांगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे. या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रफत सैय्यद यांनी एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
इच्छूक उमेदवार संपर्कात
त्यात म्हटले आहे की, दलित, अल्पसंख्याक मतांच्या जोरावर अनेक जण लोकप्रतिनिधी झाले. मात्र या समाजाला त्यांनी मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनीही मतदारांच्या भावनांशी खेळ खेळला आहे. कधी भाजपला दे धक्का तर कधी संपूर्ण राष्ट्रवादी भाजमय केली. परंतु अल्पसंख्याक समाज तसाच राहिला, म्हणून नगरपालिका निवडणुकीत धडा शिकविण्याची वेळ आली आहे. एमआयएमच्या वतीने जे इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यासाठी तयार असतील त्यांनी उमेदवारी अर्जासाठी संपर्क करावा, असे आवाहन रफत सैय्यद यांनी केले आहे. दरम्यान शहादा पालिका निवडणुकीत या पक्षाची भूमिका महत्त्वाची राहिली होती. चमत्कारीत रित्या चार नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे नंदुरबार पालिका निवडणुकीत एमआयएम कोणती जादू करते याकडे लक्ष राहणार आहे.