गो रक्षक आक्रमक : दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
नंदुरबार- नगरपालिकेच्या कचराडेपोत जनावरांचे शेकडो टन मास उघड्यावर फेकलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गो रक्षकांनी हरकत घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालय परीसरात नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. यात शहरातील विविध भागातून गोळा केलेला कचरा फेकला जातो. 23 ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या ट्रॅक्टरमधून मोठ्या प्रमाणावर जनावरांचे मांस या कचरा डेपोत उघडयावर फेकल्याचे आढळून आले, त्यामुळे खळबळ उडाली आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्यांनी हरकत घेऊन मांस फेकणार्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक रमेश पवार, पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. कचरा डेपोत फेकलेले जनावरांचे मांस गाईंचे आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकार्यांना बोलविण्यात आले आहे. आरोग्य पथकाने मांसाचे नमुने घेतले असून त्याच्या अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.