विरोधी पक्षनेता चारूदत्त कळवणकर : राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
नंदुरबार- नगरपालिकेतील सत्ताधार्यांच्या अधिपत्याखालील सीबी लॉन, इंदिरा गांधी सभागृह, छत्रपती नाट्यमंदिर आदी नगरपरिषदेच्या मालमत्तांचा बुडवलेला कोट्यांवधी रुपयांचा मालमत्ता कर भरला जात नाही. तोपर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू राहील,असा इशारा विरोधी पक्षनेता चारुदत्त कळवनकर यांनी दिला आहे. महिलांना राजकारण व समाजकारणात सक्षम करण्याचे जे सरकारी धोरण आहे, त्याला छेद देण्याचे काम नंदुरबार पालिकेच्या सत्ताधारी करत आहे यासंदर्भात राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल, अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा पालिकेतील विरोधी पक्षनेता अॅड.चारुदत्त कळवणकर यांनी पत्रकान्वये दिली आहे. नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत विषय क्रमांक 1 व 2 हे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी सर्वसंमतीने स्थगित केले असतांना आणि व्हिडिओ चित्रीकरण झालेले असतांनाही आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सदरचा विषय मंजूर झाला असल्याचे वक्तव्य केले. वास्तविक मुख्याधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी असून त्यांना कायद्याने अधिकार दिले आहेत. पण बहुमताचा वापर करून मुख्याधिकार्यांना स्थगिती ऐवजी ठराव मंजूर झाल्याचे सांगण्यासाठी त्यांनी दबाव आणला, हे स्पष्ट झाले. नगरपालिकेच्या कारभारात आ.रघुवंशी हे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.