नंदुरबार पालिकेच्या सभेत दांगडो ; नगरसेविका पतीचे डोके फोडले

0

आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक ; शहरात अफवांचे पीक जोमात

नंदुरबार:- पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषयांचे वाचन सविस्तर करावे, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केल्यानंतर वाद उफाळल्याने सत्ताधार व विरोधक समोरा-समोर भिडले तर या प्रकारात नगरसेविका संगीता सोनवणे यांच्या पतीच्या मारहाण झाल्याने त्यांचे डोके फुटल्याने त्यांना जबर दुखापत झाली. या प्रकारानंतर सभागृहाबाहेर दोन्ही गटातील नगरसेवक व समर्थक भिडल्याने शहरात दंगलीची अफवा पसरली.

आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक
जमावाने परदेशीपूरा भागातील आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयावर दगडफेक व बाटल्या फेकल्याचे सांगण्यात आले. या प्रकारानंतर आमदारांच्या निवासस्थानाभोवती कार्यकर्ते व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

बाजारात अफवांचे पीक
मंगळवारी शहराचा बाजार असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरीक शहरात आले होते मात्र शहरात दंगल पसरल्याच्या अफवेने अनेकांनी मिळेल त्या वाहनाने घरचा रस्ता धरला तर शहरातील सराफा बाजार, नगरपालिका परीसरातील व्यापार्‍यांनी अप्रिय घटनेच्या भीतीने दुकाने पटापट बंद केली. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू, शहरात शांतता ठेवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.