नंदुरबार पोलिसांची गुन्हेगारांवर कारवाई

0

नंदुरबार। आगामी गणेशोत्सव, नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर वक्रदृष्टी टाकून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाईचे अस्त्र उगारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंकज चौधरी यास एमपीडीएअंतर्गत स्थानबध्द करुन त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या कारवाई अंतर्गत 24 जणांवर हद्दपारीची कारवाई होणार आहे.

आगामी गणेशोत्सव, नवरात्री आणि नगरपालिका निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पारपडाव्यात यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भुमिका घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. नंदुरबार शहरात ज्या व्यक्तींकडून सामाजिक वातावरण दुषित करण्याच्या प्रयत्न केला जातो. ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो अशा व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

एकाची कारागृहात रवानगी
नंदुरबार शहरातील साक्री नाका भागात राहणारा पंकज नामदेव चौधरी याला स्थानबध्द करण्यात आले असून त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यावर 14 गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहरातील 24 जणांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार असल्याचाही इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.