नंदुरबार येथील वार्ड क्रमांक 8 मधील रस्ता तयार करा

0

नंदुरबार । शहरातील वार्ड क्रमांक 8 मध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने या भागातील नागरिकांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नगरपालिका आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्या वादातुन ही समस्या निर्माण झाली आहे. वार्ड क्रमांक आठमध्ये संजय नगर,गावळीवडा हा भाग येतो. संजय नगरमध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे, तो आदिवासी विकास विभागाच्या हद्दीत येतो. या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून खड्डे पडतात. याचा अंदाज येत नसल्याने लहान मुले,वृद्ध माणसे पडून जखमी होत असतात. मोटारसायकल चालक ही पडून जखमी होत असल्याने या रस्त्याची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत नागरिकांनी नागरपालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या,मात्र त्याकडे सत्ताधार्‍यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकानी केला आहे.

संजयगांधी नगराकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष
रास्ता बनविण्यासाठी आदिवासी विकास विभाग परवानगी देत नाही,असे पालिकेचे म्हणणे आहे. वास्तविक शहरात अनेक ठिकाणी अडचणींवर मार्ग काढून रस्ते बनविण्यात येत आहे. मात्र संजय नगरमध्ये जाणार्‍या रस्ते कामाला खोडा घातला जात आहे. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी नगरसेवक निवडून देत पालिकेत प्रतिनिधीतत्व करण्यासाठी पाठविला आहे,असे असतांना वार्ड क्रमांक आठ मधील रस्त्यांची ही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शहर स्मार्टच्या दिशेने वाटचाल करीत असतांना या रस्त्याचे भाग्य केव्हा उजळेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.